जालना – पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाची शैक्षणिक सहल नुकतीच अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. ही सहल दि. १० ते १६ जानेवारी या कालावधीत एकूण ६ दिवसांची असून विद्यार्थ्यांनी बेंगळूरू, म्हैसूर आणि उटी या प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी तीन राज्यांचा प्रवास करत विविध संस्कृती, इतिहास व निसर्गसंपदेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
ही सहल संस्थापक सचिव डॉ. सुगदेव मांटे व अध्यक्षा सौ. रेवतीताई मांटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय नेहमीच तत्पर असून, त्याच दृष्टिकोनातून या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे, अधीक्षक किशोर वाघ आणि मुख्याध्यापक विलास लोखंडे यांनी सहलीस शुभेच्छा दिल्या.
सहलीदरम्यान बेंगळूरूची आधुनिक शहरी संस्कृती, म्हैसूरचा ऐतिहासिक वारसा तसेच उटीचा निसर्गसौंदर्य विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासपूर्ण ठरले. संस्कृती व निसर्ग यांची सखोल माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडली.
या सहलीच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल बांडगे, प्रा. मंगेश लोखंडे, वाटूर येथील प्राचार्य अर्जुन राजबिंडे, प्रा. लक्ष्मण खरात, वैभव भोरकडे, सोनाली कोळसे, प्रा. दिनेश कापरे, प्रा. धनराज भोसले, प्रा. राजू धनवई, गजानन लोखंडे, तुकाराम लोखंडे, भागवत पानपाटील आदी शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
एकूणच ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध व संस्मरणीय ठरली.



















