पंढरपूर – जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीची तयारी सर्वच नेत्यांनी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजप कडून तर विरोधी भालकेंकडून निवडणूकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या निवडणूकांसाठी उमेदवारी कोणास मिळणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर मिनीविधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे आता भाजपने पूर्ण ताकदीने लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाच्या विजयी घौडदौडीमुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यां मध्ये देखील उत्साह निर्माण झाला आहे.
दरम्यान पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहरातील टिळक स्मारक मंदिर येथील भाजपाच्या कार्यालयात घेण्यात आल्या. यावेळेस अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून आले. इच्छुकांच्या मुलाखती जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार प्रशांत परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक यांनी घेतल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पाच ते सहा वर्षानंतर या निवडणूका होत असल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांच्या पदाधिकारी तसेच नेते मंडळींकडून गावागावात बैठका घेऊन कोणाला उमेदवारी द्यावयाची याबाबतची चाचपणी देखील करण्यात आली आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर परिचारक गटाचे वर्चस्व आहे. मात्र सध्या नेत्यांच्या गटा पेक्षा भाजपासहित इतर राजकीय पक्षांकडून आपआपल्या पक्षांवर निवडणुकां लढविण्यावर प्राधान्य दिले जात आहे. नगरपालिका तसेच महापालिकांच्या निवडणूकी प्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप लक्ष घालणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार असा सामना झालेला आहे. मात्र यंदाच्या निवडणुका भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत पंढरपूर तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
————————-
भालके यांच्या बंगल्यावर इच्छुकांची मोठी गर्दी
अनेकांनी दिल्या मुलाखती )
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भालके गटाची बैठक भगीरथ भालके यांच्या बंगल्यावर रविवारी घेण्यात आली बैठकीस मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात भालके गटाला मोठा मानणारा वर्ग आहे यामुळे नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भालके गटाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे भालके गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह वाढला असून त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी भालके यांच्या पंढरपूर येथील बंगल्यावर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी मोठ्या प्रमाणात भालके गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील अनेक जण भालके गटाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांना सांगितले. एकंदरीतच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी भालके गटाने देखील जय्यतपणे सुरू केली असल्याचे दिसून येत आहे .

























