बार्शी – नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी डॉ सुजित करपे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रा प्रविण जावळे व उपाध्यक्ष डॉ. अमोल शहा यांनी यासंबंधीचा ठराव नुकताच मुख्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडला.
नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन हे फार्मसी क्षेत्रातील अडीअडचणी व त्यामधील विकास यासंबंधी कटिबद्ध अशी देशव्यापी संघटना आहे. तसेच फार्मसी संबंधातील शासनाची ध्येय धोरणे याबाबतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल करण्यासंबंधी या असोसिएशनचे कामकाज सुरु आहे.
डॉ. सुजित करपे यांचे सोलापूर जिल्ह्यातील फार्मसी क्षेत्रातील अन्यन्यसाधरण योगदान राहिले आहे. त्यामुळेच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे अध्यक्ष डॉ सचिन कोतवाल यांनी कळविले आहे.
सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी, बार्शी येथे अनेक वर्ष प्राचार्य पदाची धुरा सांभाळत असताना महाविद्यालयांना एका विशिष्ट उंचीवर त्यांच्या कार्यातून स्थान प्राप्त करुन दिले. यामुळे यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुणदादा बारबोले यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांची नियुक्ती ही संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून असोसिएशनचे सदस्य जाळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण केले जाईल. तसेच असोसिएशनच्या माध्यमातून फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी व सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. सदर नियुक्ती बाबत डॉ. करपे यांनी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या नियुक्ती मुळे सोलापूर जिल्ह्यातील फार्मसी क्षेत्रामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.




















