भोकरदन – श्रीक्षेत्र शिऊर ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथून सालाबादप्रमाणे निघालेली संत गजानन महाराज पायी दिंडी गुरुवारी, २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास भोकरदन शहरात दाखल झाली. यावेळी शहराला प्रदक्षणादेत शहरातील शेकडो भक्तांनी दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले असून, ‘गण गण गणांत बोते’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान शहरातील हॉटेल संत गजानन येथे महाआरती संपन्न झाली होती.
गजानन महाराज सेवेकरी साहेबराव बारोकर यांच्या विनंतीला मान देऊन दिंडीचे चालक शिवाजी थळकर, अध्यक्ष बंडू नाना देशमुख, सचिव भागीनाथ जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हॉटेल संत गजानन येथे थांबून महाआरतीचे आयोजन केले. या महाआरतीचे मानकरी रावसाहेब बारोकर ठरले. यावेळी प्रभाकर खंडगवरे, हरिभाऊ त्रिभुवन, शेषराव पवार यांच्यासह दिंडीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांची भोजन व निवासाची उत्तम सोय
दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी बारोकर-जाधव यांनी पुढाकार घेतला. साहेबराव बारोकर यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, प्रवासाच्या थकव्यामुळे वारकऱ्यांच्या रात्रीच्या निवासासाठी किशोर जाधव यांनी आपल्या ‘जानव्ही कॉम्प्लेक्स’ येथे सोय करून दिली. बारोकर आणि जाधव परिवाराने दिंडीतील वारकऱ्यांची अखंड सेवा करून भक्तीचा आदर्श घालून दिला.
या आध्यात्मिक सोहळ्याला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती. यामध्ये काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,उद्योजक हुकूम सेठ चुंडवत, प्रभू अप्पा घोडके , बापू जाधव, मुख्याध्यापक विठ्ठल घायाळ, विकास जाधव, भूषण जाधव,ईश्वर एम. इंगळे, धनंजय जाधव, बंटी भैय्या देशमुख, विनोद, देशमुख, गणेश गोरे, योगेश जाधव राजू गोरे, नगरसेविका गयाबाई जाधव, हेमा ताई जाधव यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
याही सेवेकऱ्यांचा खारीचा वाटा
वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब बारोकर, ऋषिकेश बारोकर, विनोद जाधव, शंकर जेठे, सुनील चोपडे, आयुष चोपडे, पांडुरंग बोरसे, शंकर कुठे, लखन आढावे यांनी विशेष परिश्रम घेतले. भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या स्वागतामुळे भोकरदन शहरातील वातावरण प्रसन्न झाले होते.
तद नंतर काही वेळ विश्रांती घेत सकाळी चार वाजेला पालखी श्रीक्षेत्र शेगांवकडे रवाना होणार होती.
गजानन महाराजांची सेवा हेच माझे परमभाग्य” – साहेबराव बारोकर
दिंडी स्वागताच्या प्रसंगी आपली भावना व्यक्त करताना साहेबराव बारोकर म्हणाले की, “संत गजानन महाराज ही आमची श्रद्धा आहे. दरवर्षी नियमाने श्रीक्षेत्र शिऊर येथील पायी दिंडी २२ जानेवारी रोजीच माझ्या हॉटेलला भेट देते, हा निव्वळ योगायोग नसून महाराजांचा आशीर्वाद आणि माझे मोठे भाग्य आहे. वारीत चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या रूपात प्रत्यक्ष महाराजच माझ्या दारी येतात, अशी माझी धारणा आहे. या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळते, याचे मला समाधान वाटते. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत ही अखंड सेवा अशीच सुरू ठेवण्याचा माझा मानस आहे.


























