सोलापूर – ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच ते पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे होटगी पंचायत समिती गणात काॅंग्रेसला धक्का बसला असून भाजपाला फायदा होणार आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सचिन व्हनमाने यांनी भाजपात काम करणार असल्याचे सांगितले.
सचिन व्हनमाने यांच्या मातोश्री होटगी पंचायत समिती गणातून काॅंग्रेस पक्षाकडून इच्छुक होत्या. मात्र त्यांची उमेदवारी डावलून माजी तालुकाध्यक्षांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्याने व्हनमाने यांनी नाराजी व्यक्त करत तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. व्हनमाने हे काॅंग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्यरत असून सध्या दक्षिण सोलापूर तालुका युवक काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम करीत होते. त्यांनी पक्षवाढ, संघटन बांधणी, सामान्य जनतेचे प्रश्न, कार्यकर्त्यांचे प्रश्न व पक्षाच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी काम केले. पक्षांतर्गत परिस्थिती, कार्यपद्धती, अपेक्षित समन्वयाचा अभाव व सतत निर्माण होणारा वरिष्ठांच्या जाच यामुळे वैयक्तिक व सामाजिक कार्य करताना त्रास होत आहे. या कारणांमुळे दडपण येत असल्यामुळे पदाचा राजीनामा दिल्याचे व्हनमाने यांनी सांगितले.
























