वळसंग – पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावातील यत्नाळ रोड अडगले वस्तीत सोमवार सकाळी १०.०० वा.एका ५४ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाड, बॅट आणि इतर हत्यारांनी प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दर्याप्पा गंगाधर काळे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी निलेश अडगले याने दर्याप्पा काळे यांच्याकडून सुमारे २० लाख रुपये घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून तो पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होता.मात्र, रविवारी रात्री त्याने फोन करून “माझं पैशांचं काम झालं आहे, सोमवारी सकाळी ८ वाजता शेतात येऊन तुमचे पैसे घेऊन जा,” असे सांगून बोलावले होते.सोमवारी सकाळी दर्याप्पा काळे हे आपल्या मुलीसह निलेश अडगले याच्या शेतातील वस्तीवर पैसे आणण्यासाठी गेले. तिथे पैशांची मागणी केली असता, आरोपी निलेश, त्याचे वडील, दोन भाऊ आणि आई यांनी पैशांवरून वाद घालत थेट त्यांच्या अंगावर धावून गेले. जीव वाचवण्यासाठी दर्याप्पा आणि त्यांचा मुले पळू लागले असता, आरोपींनी त्यांना ओढून पकडून आणले त्यानंतर आरोपी महेश अडगले, प्रकाश अडगले आणि त्यांच्या इतर कुटुंबीयांनी दर्याप्पा यांच्या डोक्यात आणि हातावर कुऱ्हाड आणि बॅटने जबर वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दर्याप्पा यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, सोलापूर सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. “आम्हाला आमच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी फक्त न्याय हवा आहे,” अशी आर्त हाक मृताच्या मुलीने दिली आहे.
Post Views: 11