अक्कलकोट : अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अक्कलकोटची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.प्रारंभी श्री स्वामी समर्थ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन शंकर अजगोंडा यांनी गत आर्थिक वर्षातील आर्थिक लेखाजोखा सभासदांसमोर मांडला. संस्थेच्या वतीने सभासदांना सुमारे ११ टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले.सुमारे ४१८ सभासद असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून स्वभांडवलातून सर्वसाधारण कर्जासाठी १० लाख रुपये, तर तातडीच्या गरजेसाठी ३० हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. कर्जाचा व्याजदर १० टक्के असून सभासदांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच एखाद्या सभासदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची संस्थेची योजना असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी आदर्श शिक्षक, सभासदांचे गुणवंत पाल्य तसेच नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेच्या व्हाईस चेअरमन अपर्णा मानकोसकर, डॉ. अशोक हिप्परगी, शिक्षक समितीचे दयानंद कवडे, राजशेखर उंबराणीकर, सिद्धाराम बिराजदार यांच्यासह सर्व संचालक मंडळ,संस्थेचे सभासद आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.संस्थेच्या वतीने सर्वांना ग्रामीण ढंगातील जेवणाचा आस्वाद देण्यात आला.सभेचे सूत्रसंचालन दत्तात्रय सावंत व शरणप्पा फुलारी यांनी केले. बसवराज खिलारी यांनी आभार मानले.
Post Views: 10