सोलापूर – स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसावर धडाकेबाज कारवाई करत जेसीबीसह ट्रॅक्टर-ट्रॉली, वाळु असे एकुण १४,५७,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मौजे कोळा ता. सांगोला जि. सोलापूर या गावच्या लगत असलेल्या ओढयाच्या पात्रातून आबा कोळेकर व एक अज्ञात इसम जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून त्याची चोरून वाहतूक करून विक्री करीत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण तपास पथक त्या ठिकाणी पोहोचुन छापा टाकला असता, जेसीबीच्या सहाय्याने वाळु भरत असलेले ट्रॅक्टर-ट्रॉली जागेवर सोडून जेसीबी व ट्रॅक्टर चालक पळून गेले. या ठिकाणावरील मुद्देमाल गुन्हयाचे कामी जप्त करून आरोपींतावर ७८/२०२६ बीएनएस कलम ३०३ (२), पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९, १५ प्रमाणे सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
नमुद गुन्हयात मौजे कोळा ता. सांगोला या लगत असलेल्या ओढयाच्या पात्रातुन ९,००,००/- रू. किंमतीचे जेसीबी इंडीया कंपनीचे एक जेसीबी, ५,५०,०००/- रू किंमतीचे ट्रॅक्टर-ट्रॉली, ७,०००/- रू किंमतीचे एक ब्रास वाळू असे एकुण १४,५७,०००/- रू किमतींचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोह/भरमशेटटी सांगोला पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण कडील सपोनि विशाल वायकर, पोलीस हवालदार विरेश कलशेट्टी, पोकॉ/यश देवकते यांनी बजावली आहे.
























