बार्शी – येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, संवर्धक निवृत्ती गोविंदराव तथा कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी सुप्रसिध्द व्याख्याते, माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे प्रेरक व्याख्यान झाले आहे. सोमवार दि. २ रोजी सकाळी ११ वा. भाषा अभ्यासक तथा निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांचे ‘माझ्या मना रे ऐक जरा’ या विषयावर व्याख्यान होईल. नगराध्यक्षा तेजस्विनी कथले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. बुधवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता ख्यातनाम साहित्यिक, ९२ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
अ.भा. मराठी साहित्य महामंडळ, पुणेचे अध्यक्ष प्रा. मिलींद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्रांगणात हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, सचिव पी.टी.पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे यांच्यासह संस्था विश्वस्त, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी जयंती सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत.
डॉ.आमटे दांपत्य यंदाच्या पुरस्काराचे मानकरी गडचिरोली जिल्हयातील हेमलकसा येथे आदिवासींसाठी लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आयुष्यभर आरोग्य, शिक्षण आणि वन्यजीव संरक्षण करणारे थोर समाजसेवक, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांना संयुक्तरित्या यंदाचा कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. सोमनाथ रोडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
यंदा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधनामुळे दि. ३१ रोजी होणारी महिलांची मोटारसायकल रॅली, दि. ३ फेब्रुवारी रोजी होणारा विविध गुणदर्शनचा कार्यक्रम व बुधवार दि. ४ रोजी सकाळी ७-३० वा. बार्शी शहरातून निघणारी जनजागरण मिरवणूक रद्द करण्यात आले आहेत. इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार आहेत.



























