देगलूर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री रामलिंग देवस्थान, रामपूर ( प.हो.) ता. देगलूर, जि. नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील लक्ष्मण शक्ती व अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज दि. ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा धार्मिक व अध्यात्मिक सोहळा भक्तिभावाने संपन्न होणार असून संपूर्ण परिसर शिवनामाने दुमदुमणार आहे. या आध्यात्मिक सोहळ्याचे संयोजन ह. भ. प. गुंडप्पा महाराज रामपुरकर यांनी केले आहे.
देगलूर तालुक्यातील रामपुर येथील श्री रामलिंग देवस्थान हे अत्यंत पुरातन, ऐतिहासिक व पवित्र असून अनेक ऋषीमुनी, साधुसंत व साधकांच्या तपश्चर्येने पुण्यभूमी म्हणून ओळखले जाते. याच पवित्र स्थानी भाविकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रासह तेलंगणा व कर्नाटक राज्यातील नामांकित कीर्तनकार, भजनी मंडळी व वादकांची उपस्थिती लाभणार आहे.
महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘लक्ष्मण शक्ती’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास परिसरातील प्रमुख वाचक, सुचक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, या दिवशी अन्नदानाचा मान श्री शेषेराव हुलबा पाटील इंगोले, रामपूर यांना लाभला आहे.
दिवसभर चालणारी भक्तीमय कार्यक्रमांची रेलचेल
हा भक्तीमय अध्यात्मिक कार्यक्रमाची पर्वणी या भागातील भक्तगणांना मिळणार आहे. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६ ते ८ श्री रामलिंग रुद्राभिषेक, ९ ते १२ गाथा भजन, सायंकाळी ४ ते ६ भावार्थ रामायण, ६ ते ८ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत जागर असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
नामवंत संत-महंतांच्या कीर्तनांची पर्वणी
या सप्ताहात ह.भ.प. श्री भागवताचार्य कृष्णा महाराज राजुरकर, ह.भ.प. श्री अंतेश्वर गुरुजी नागलगावे बिचकुंदा, श्री ह.भ.प. अवधुत भारती महाराज एकंबा, श्री ह.भ.प. अमोल महाराज कारेपूर लातूर, श्री ह.भ.प. विलास महाराज अंबुलगा, श्री ह.भ.प. गुरुराज महाराज देगलूरकर, श्री ह.भ.प. गंगाधर महाराज वसूर, श्री ह.भ.प. संगयअप्पा स्वामी कंठाळीकर मदनुर यांच्यासह अनेक नामवंत संत-महंतांचे कीर्तन संपन्न होणार आहे.
अन्नदानातून मानवतेचा जागर
संपूर्ण सप्ताहात विविध मान्यवर भाविकांकडून अन्नदान व फराळ सेवा दिली जाणार असून, दररोज रात्री कीर्तनानंतर फराळ सेवा तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी काला कीर्तनानंतर महाप्रसाद अन्नदान होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. हा भव्य धार्मिक सोहळा श्री रामलिंग देवस्थान, रामपूर व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने तसेच गुंडप्पा महाराज रामपूर, यादवराव महाराज झरीकर व शंकर स्वामी रामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व शिवभक्त व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीमय, अध्यात्मिक व पुण्यदायी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
























