माळशिरस – तालुक्यातील मेडद येथील एका शेतकरी कुटुंबातील कन्येने आपल्या कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. शितल बाळकृष्ण हांगे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून ‘तालुका कृषी अधिकारी’ पदी निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातून यशाचे शिखर
शितल यांचे प्राथमिक त्यांच्या राहत्या गावी म्हणजेच ग्रामीण भागातच पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण सातारा इथे पूर्ण केले.शेतीची पार्श्वभूमी असलेल्या घरातून येत असतानाही त्यांनी शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. घरची परिस्थिती बेताची असताना आणि शेतीतील कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी आपले ध्येय निश्चित केले होते.
शिक्षणाचा प्रवास
प्राथमिक – जिल्हा परिषद ,मेडद (ग्रामीण भाग).
माध्यमिक _ यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,सातारा
उच्च शिक्षण: कृषी महाविद्यालय धुळे इथे पदवी (B.Sc. Agri) पूर्ण केली. पदव्युत्तर शिक्षण (Msc.Agri) कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथे पूर्ण झाले.
स्पर्धा परीक्षा: पदवी मिळाल्यानंतर त्यांनी एमपीएससी (MPSC) द्वारे घेण्यात येणाऱ्या कृषी सेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि घवघवीत यश संपादन केले.
“शेतकऱ्याची मुलगी असल्याने शेतीतील समस्यांची मला जवळून जाण आहे. कृषी अधिकारी म्हणून काम करताना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा माझा मानस आहे,” अशी प्रतिक्रिया शितल हांगे यांनी निवडीनंतर व्यक्त केली.
कौतुकाचा वर्षाव
शितल यांच्या या यशाबद्दल त्यांचे वडील बाळकृष्ण हांगे व कुटुंबीयांचा अभिमान गगनात मावेनासा झाला आहे. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीने अधिकारी पदापर्यंत मजल मारल्यामुळे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थिनींसाठी त्या एक प्रेरणास्थान ठरल्या आहेत























