अक्कलकोट – एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
समारोप सत्रात संस्थेच्या संचालिका पवित्रा खेडगी हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले होते. पवित्रा खेडगी यांच्या हस्ते परिषदेत सहभागी संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.याप्रसंगी
कृषी अर्थकारण, आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, मत्स्य शेती, शाश्वत विकास, जैविक शेती, पर्यावरणपूरक शेती आणि कृषी क्षेत्रातील अर्थसहाय्य या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करत उपस्थित संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मोलाचे विचार दिले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील डॉ. राहुल मोहपारे यांनी “शेतीचा बजेट व शेती करण्याच्या आधुनिक पद्धती” या विषयावर संशोधनपर विचार मांडले.
त्यानंतरच्या सत्रात संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंद्रूप येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष कदम यांनी “कृषिविषयक आराखडा व आधुनिक शेतीकडे वाटचाल” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी पारंपरिक शेती व प्रात्यक्षिक (आधुनिक) शेतीतील फरक स्पष्ट करून शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. तिसऱ्या सत्रातील परिसंवादात आधुनिक व सेंद्रिय शेती करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच शासनाकडून मिळणारे विविध अनुदान व अर्थसहाय्य योजना यावर सखोल चर्चा झाली. दयानंद महाविद्यालय, सोलापूरचे प्राचार्य डॉ. बद्रीनाथ दामजी यांनी शेतीतील विविध पिके, त्यांपासून मिळणारे आर्थिक लाभ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये कृषी क्षेत्राला दिलेले प्राधान्य या विषयांवर व्याख्यान दिले. शेतकऱ्यांनी पिकांची निवड करताना आर्थिक लाभ व संभाव्य धोके लक्षात घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यानंतर सेंद्रिय कृषी तज्ज्ञ व ओम शांती मार्गदर्शक डॉ. श्रीमंत रायगोंडे ( भुरीकवठा ) यांनी
शाश्वत शेती संदर्भात मार्गदर्शन केले.त्यांनी आधुनिक व सेंद्रिय शेतीचा समन्वय साधताना आवश्यक दक्षता व नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध विकासात्मक संकल्पना, शाश्वत शेतीचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. या परिषदेमुळे भारतीय शेतीला निश्चितच नवे दिशा व बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयश्री बिराजदार, आबाराव सुरवसे होते. डॉ. जगदेवी कुंटोजी, किशोर थोरे आदीं प्रमुख उपस्थित होते.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा. संध्या इंगळे, डॉ. ए. पी. सुरवसे, डॉ. श्याम शिंदे, प्रा. रमेश धोत्रे, प्रा. नागेश कांबळे, प्रा. दत्तात्रय साळुंखे आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
























