सोलापूर : भाषा ही केवळ बोलण्याचे साधन नसून ती संस्कृतीची ओळख असते. एखाद्या समाजाची संस्कृती, इतिहास आणि विचारसरणी ही त्या समाजाच्या भाषेतून व्यक्त होत असते. त्यामुळे भाषेचा संकोच होऊ देऊ नका. भाषा अस्तित्वात राहिली तरच समाज आणि संस्कृतीही टिकून राहतात; अन्यथा त्या विस्मरणात जातात. असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. नानासाहेब गव्हाणे यांनी केले.
सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किशोर पवार होते.
पुढे बोलताना प्रा. गव्हाणे म्हणाले की, साहित्य माणसाला जगण्याची दिशा देते, जीवन अधिक सुंदर कसे जगावे हे शिकवते. समाजाच्या समष्टी हिताचा विचार त्यात सामावलेला असतो. त्यामुळे युवकांची पाऊले ग्रंथालय आणि वाचनालयाकडे वळून, वाचन चळवळ वाढायला हवी.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी भारतीय भाषांच्या सद्यस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय रेवजे यांनी केले. तर आभार प्रा. मोहन चव्हाण यांनी मानले. यावेळी डॉ. मधुकर जडल, डॉ. दशरथ रसाळ, डॉ. प्रदीप जगताप आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
*फोटो ओळ: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बोलताना प्रा. नानासाहेब गव्हाणे यावेळी उपस्थित मान्यवर*
*ग्रामीण व प्रादेशिक बोलींचे जतन व्हावे*
यावेळी प्रा. नानासाहेब गव्हाणे यांनी भाषेच्या विकासात बोलीभाषांचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्रातील विविध बोली या मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा भाग आहेत. त्यामुळे ग्रामीण व प्रादेशिक बोलींचे जतन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






















