धाराशिव – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान नगर परिषद शॉपिंग सेंटर समोरील असलेली झाडे तोडण्यात येऊ नयेत, अशी मागणी नगरसेवक नाना घाटगे, अमित उंबरे व न प शॉपिंग सेंटरधारकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
धाराशिव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या भागातील रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे समजते. त्यासाठी रस्ता मजबुतीकरण व नालीचे काम करीत असताना नगर परिषदेच्या श्री तुळजाभवानी शॉपिंग सेंटर समोरील गाळेधारकांनी गेल्या ४० वर्षांपासून जोपासलेली १२ झाडे तोडणार असल्याचे समजते. संबंधित ठेकेदारास झाडे न तोडता नाली करून किंवा रस्ता खोदून आवश्यक तेवढे रस्त्याचे काम करावे. तसेच सध्याच्या रस्त्याच्या उंचीपेक्षा नवीन होणारा रस्ता जास्त उंचीचा करण्यात येऊ नये. त्यामुळे भविष्यात दुकानदारांच्या दुकानात पावसाळ्यात पावसाचे पाणी जाणार नाही. तर पर्यावरणाची हानी करून झाडे तोडू नयेत यासाठी सर्व दुकानदारांनी कडाडून विरोध केला आहे. जर झाडे तोडण्यास परवानगी दिली तर नाईलाजास्तव गाळेधारकांच्या मागणीचा विचार करून व पर्यावरण वाचविण्यासाठी त्याच जागेवर आमरण उपोषण करावे लागणार असल्याचा इशारा नगरसेवक नाना घाटगे यांच्यासह इतरांनी दिला आहे.
या निवेदनावर नगरसेवक संतोष घाटगे, शिवसेना (ठाकरे) चे नेते अमित उंबरे, नितीन शेरखाने, श्यामसुंदर भन्साळी, अनिल शिंदे, बजरंग काळे, संजय तुपे, दिलीप लोकरे, रवींद्र गुळवे, राजेंद्र मोरे, जालिंदर पाटील, संजय पवार, सागर चांडक, अशोक सपकाळ, पवन सुरवसे, महेश चौधरी, आदित्य वडगावकर, सागर करंडे, संतोष माने, पुरुषोत्तम घोगरे, बाळासाहेब घोगरे आदींसह इतरांच्या सह्या आहेत.
























