सोलापूर – दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड गुरुवारी १२ मार्च रोजी पंचायत समितीच्या विसावा सभागृहात पार पडली. यावेळी सभापतीपदासाठी औराद गणाचे पंचायत समिती सदस्य संदीप टेळे तर उपसभापतीपदासाठी बोरामणी गणाच्या वर्षा पटणे यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली . आमदार सुभाष देशमुख व आमदार सचिन कल्याणशेटी यांची संदिप टेळे नावावर एकमत झाल्याने निवड बिनविरोध झाली.
यावेळी कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर नृत्य व गुलालांची उधळण करीत जल्लोष केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी काम पाहीले. यावेळी दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सहायक म्हणून काम पाहीले.
प्रारंभी आमदार सचिन कल्याणशेटी व सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सभापतीपदासाठी संदिप टेळे तर उपसभापतीपदासाठी वर्षा पटणे यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी दोन वाजता बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, नेताजी खंडागळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोटे, अतुल गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष महेश बिराजदार, सिद्धाराम हेले, हणमंत कुलकर्णी, जिल्हा चिटणिस यतीन शहा , औरादचे माजी सरपंच शांतकुमार गडदे, बाळासाहेब पाटील, नितीन रणखांबे, शशिकांत दुपारगुडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, विजय राठोड, शिल्पा बिराजदार, अंबिका पाटील, सुरज पाटील, बलवान गोतसुर्वे, पंचप्पा धनशेट्टी, अंबिका दुपारगुडे आणि प्रियांका आसबे उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या प्रियांका कुबसंगे आदी पंचायत समिती सदस्य उपस्थित होते .
या निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापतींचा सत्कार करण्यात आला.
….
….
सर्वसमावेशक व्यक्तिमत्वामुळे टेळे यांची निवड
…
संदिप टेळे यांनी २०१७ च्या निवडणूकीत पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यावर उपसभापती पदाची संधी मिळाली. त्यानंतर औराद पंचायत समिती गणातून निवडून आल्यावर आमदार देशमुख व आमदार कल्याणशेटी दोन्ही गटाकडून त्यांच्या नावावर एकमत झाले. सर्वसमावेशक व शांत स्वभावामुळे टेळे यांना संधी मिळाल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.
..
तालुक्याच्या विकासासाठी एकत्र
…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत आमदार देशमुख व आमदार कल्याणशेटी यांच्यामध्ये गटबाजी दिसून आले होते. मात्र निवडणूक संपल्यानंतर पक्षावाढीसाठी व तालुक्याच्या विकासासाठी दोन्ही गट एकत्र आल्याचे दिसून आले.
बिनविरोध निवडीमुळे तालुक्याच्या राजकारणात एकोपा दिसून आला असून, आगामी काळात तालुक्याच्या विकासकामांना गती देणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
…


























