सोलापूर : वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हे पत्रकारितेसाठी अत्यंत उपयुक्त साधन ठरत आहे. बातमी संकलन, माहितीचे विश्लेषण, व्हिडिओ-फोटो संपादन, डेटा अभ्यास आणि माहिती पडताळणी यांसारख्या विविध कामांमध्ये एआयचा प्रभावी वापर करून पत्रकारिता अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक करता येते, असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा एआयविषयक तज्ज्ञ मोहसीन मुल्ला यांनी व्यक्त केले.
डाटा लीड्स , गुगल , एशियन डेव्हलपमेंट बँक आणि एव्हीपीएन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या एडीआयआरए या उपक्रमांतर्गत सोलापुरातील पत्रकारांसाठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेली विशेष ऑनलाइन कार्यशाळा शनिवारी गुगल मीट द्वारे पार पडली. या कार्यशाळेत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील माध्यमकर्मींसाठी एआयच्या संधी आणि उपयोगांविषयी तज्ज्ञ मोहसीन मुल्ला यांनी
सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान मोहसीन मुल्ला यांनी पत्रकारितेत वापरता येणाऱ्या विविध एआय टूल्सची माहिती देत न्यूज रिसर्च, डेटा अॅनालिसिस, कंटेंट क्रिएशन, ग्राफिक्स डिजाईन, फोटो-व्हिडिओ एडिटिंग, हेडलाईन जनरेशन आणि फॅक्ट-चेकिंग यांसारख्या कामांमध्ये एआय कसा उपयोगी ठरू शकतो याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. बदलत्या डिजिटल युगात पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्या कामाची गुणवत्ता वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच एआयचा वापर करताना विश्वसनीयता, नैतिकता आणि माहितीची पडताळणी या बाबींचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध शंका आणि प्रश्नांना मोहसीन मुल्ला यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.
या कार्यशाळेला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख यांनी केले तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले.






















