सोलापूर : शहरात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक अनोखा आणि लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आला. WOW (व्हॉव) महिला संघटनेच्या वतीने पार्क चौक येथे गॅस सिलेंडरची गुढी उभारून सरकारच्या निष्क्रियतेविरोधात प्रतीकात्मक निषेध नोंदवण्यात आला.
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या इराण–इस्त्राईल–अमेरिका तणावाचे पडसाद भारतासह विविध देशांमध्ये उमटताना दिसत आहेत. त्याचा परिणाम इंधन व गॅस पुरवठ्यावर होत असून सोलापूर शहरातही घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा प्रकर्षाने जाणवत आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी भटकंती करावी लागत असून, महिलांना विशेषतः मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर WOW महिला संघटनेने पार्क चौकात गॅस सिलेंडरची गुढी उभारून प्रशासनाचे लक्ष वेधले. या गुढीची पारंपरिक पद्धतीने पूजा व आरती करण्यात आली. तसेच, गॅस अभावी स्वयंपाकासाठी पर्याय म्हणून कोळशाचे प्रतीकात्मक वाटप करून परिस्थितीची तीव्रता दाखविली.
या वेळी विद्या लोलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “गुढीपाडवा हा आनंदाचा सण असला तरी गॅस टंचाईमुळे अनेक कुटुंबांचा उत्साह मावळला आहे. सरकारने तात्काळ उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा अशा प्रकारचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
या अनोख्या ‘सिलेंडर गुढी’ उपक्रमामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, शहरात गॅस टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
यावेळी कांचन चौगुले, सायरा शेख, शबाना शेख, मारता असादे, मदिना पटेल, शोभा गायकवाड, स्वाती गायकवाड, गीता मुळे, यशोदा सोनावणे, स्वाती मुकणार, मनीषा नलावडे, मोनिका सरकार, सारिका लामकाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.


























