ईस्लापूर – किनवट तालुक्यातील ईस्लापूर येथे दि. २७ रोजी दिलेल्या निवेदनानंतर सावरकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पालकांनी कुलूप ठोकले होते. मात्र, तब्बल तीन दिवस उलटूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे चित्र समोर येत असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षकांच्या टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी दि. २७ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेला कुलूप ठोकून आंदोलन छेडले होते. शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेविरोधात पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
डेपुटेशनच्या नावाखाली किनवट येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कारभारात गोंधळ सुरू असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पालकांना हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तीन दिवस उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेला साधी भेटदेखील दिलेली नसल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पालकाच्या मागणीला प्रतिसाद नाही प्राथमिक विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसानाची जिम्मेदार शिक्षण विभाग .
जिल्हा अधिकारी यांची मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यार्थ्यासाठी विशेष अभियान मात्र किनवट शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार मात्र चव्हाट्यावर

















