निवघा बाजार – राज्यातील ४०५ शाळांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आल्याचा शासन निर्णय नुकताच पारीत करण्यात आला असून त्यामधे निवघा बाजार येथील जि. प. कें. प्रा. शाळेची निवड करण्यात आली आहे . या उपक्रमांतर्गत आता शाळेचे रुपडे पालटणार असल्याचे सांगितले जात असून सदरच्या आदर्श शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना विनाअडथळा व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होण्याकरीता आवश्यक सर्व सोयीसुविधा मिळण्याच्या दृष्टीने आणि शाळांच्या परीपूर्ण विकासांकरीता नियोजन आराखडा तयार करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे तर या उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व शाळामध्ये विद्यार्थीनी साठी स्वतंत्र पिंक रुमची निर्मिती प्राधान्याने करण्याचे आदेश शासन निर्णयात नमुद आहेत .
येथील शाळेत नुकतीच रंगरंगोटीची कामे हाती घेण्यात आली असून या शाळेच्या विकासात्मक कामांसाठी आ. बाबुराव कदम कोहळीकर यांचा नेहमीच पुढाकार राहिला असून या शाळेसाठी विविध उपक्रम राबविणेकामी माजी सभापती बालासाहेब कदम , माजी सरपंच भास्करराव कदम , माजी सरपंच संदीप पाटील , माजी उपसरपंच श्याम पाटील , माजी सरपंच शे. इस्माईल , आदींचा पाठपुरावा राहिला आहे. डॉ . बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या उपक्रमात येथील शाळेची निवड होण्यासाठी आ.कदम यांचे महत्वाचे योगदान राहिले असून संपूर्ण निवघा वासीयां कडून त्यांचे आभार मानले जात आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील जि. प शाळेची निवड करण्यात आली आहे ही अतिशय आनंदाची बाब असून या निवडी मुळे गावच नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या शैक्षणिक वैभवात भर पडली असून शाळेला आता अंतर राष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत , शाळेला आम्ही अधिक दर्जेदार बनविण्यासाठी प्रयत्नशील राहू .
– आर. एन. वाघमारे मुख्याध्यापक निवघा बाजार

















