सोलापूर – शब्द, संवेदना आणि सर्जनशीलतेचा अद्वितीय मिलाफ अनुभवायला मिळालेल्या साहित्यिक वातावरणात *अर्लिअन के. ए. ग्रूप ऑफ सोलापूर साहित्य प्रतिष्ठानच्या* वतीने *मातृमंदिर, ढगे मळा* येथे *पाचवे कविसंमेलन व नक्षत्रांची फुले* या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासह *सौ. अस्मिता गुंड यांच्या कविता अस्मितेच्या* या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात पार पडले.
या भव्य साहित्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री प्रकाश गव्हाणे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाश जडे सर उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून अर्लिअनचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सागर गुडमेवार सर उपस्थित होते . या तिघांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत साहित्यसेवेची प्रेरणा दिली.*नक्षत्रांची फुले* या काव्यसंग्रहात ४१ साहित्यिकांचा सहभाग असून ८२ कवितांचा समृद्ध असा काव्य पुष्पगुच्छ साकारला आहे. विविध भावविश्व, जीवनदृष्टी आणि सामाजिक जाण यांचा संगम असलेल्या या काव्यसंग्रहाने रसिकांची मने जिंकली.
अर्लिअन के. ए.च्या माध्यमातून प्रकाशित झालेला हा संग्रह साहित्यविश्वातील एक उल्लेखनीय पाऊल ठरत आहे.या काव्यसंग्रहाला श्री प्रकाश महामुनी सर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून डॉ. सागर गुडमेवार सर यांचे मनोगत आणि मलपृष्ठावर कु. छाया उंब्रजकर यांचे लेखन संग्रहाला अधिक परिपूर्णतेकडे नेणारे ठरले आहे.
कविसंमेलनात सुमारे ३० साहित्यिकांनी आपल्या ओजस्वी व हृदयस्पर्शी काव्यरचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सुमारे ५० रसिकांच्या उपस्थितीने कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देव यांनी प्रभावी शैलीत पार पाडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोलापूर टीमच्या अध्यक्षा कु. छाया उंब्रजकर व मुख्य संयोजक श्री प्रकाश महामुनी यांचा मोलाचा सहभाग लाभला. तसेच प्रा. डॉ. सौ. दुर्गा जोशी, सौ. शुभदा मित्रगोत्री, श्री संतोष जाधव, श्री मुक्तेश्वर मुळे, श्री अशोक शिंदे, प्रतिभा गडेकर दंदे, मठपती परिवार आणि साक्षी बावणे यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतरीत्या पार पडला.
साहित्याच्या विश्वात नवे नक्षत्र फुलवणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ दरवळत राहील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.शेवटी आभार प्रदर्शन संतोष जाधव यांनी केले.



















