वेळापूर – अनेक वर्षांपासून कागदावरच असलेला आणि प्रत्यक्ष वहिवाटीसाठी बंद असलेला माळशिरस तालुक्यातील कोळेगांव ते कटफळ(ता सांगोला )हा नकाशावरील रस्ता अखेर प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे मोकळा झाला आहे. सुमारे ३ किलोमीटर लांबीचा हा रस्ता खुला झाल्याने माळशिरस आणि सांगोला या दोन्ही तालुक्यातील सुमारे ५०० शेतकऱ्यांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटला आहे.
अकलूज च्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, हा रस्ता मार्गी लावण्यासाठी तहसीलदार शेजुळ यांनी स्वतः दोन वेळा प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व सामंजस्याने मार्ग काढला.
हा रस्ता खुला करण्यात पिलीव चे मंडलाधिकारी विजय एकतपुरे यांची प्रबळ इच्छाशक्ती कामी आली. तसेच भूमी अभिलेख उपअधीक्षक मडके व भूमापक प्रशांत पाटील यांनी तांत्रिक बाजू यशस्वीपणे हाताळल्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. प्रणीत कांबळे व सूर्यवंशी मॅडम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कोळेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने या रस्त्यासाठी दीर्घकाळापासून पाठपुरावा सुरू होता. रस्ता खुला होत असताना माजी सरपंच रजनी प्रसाद दुपडे,उपसरपंच,सविता नागनाथ दुपडे
ग्रामपंचायत सदस्य,सुषमा धनंजय दुपडे,सुनीता ज्योतीराम सावंत,मोहिनी बाळासाहेब वाघमारे,पोलीस पाटील बिभीषण दुपडे,ॲड. नवनाथ सावंत,अजय भंडगे व गावातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
—————————————
”अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतीमाल ने-आण करण्यासाठी आता शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार नाही. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाचे हे उत्तम उदाहरण आहे.
रजनी दुपडे -माजी सरपंच



















