पंढरपूर – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, एकनाथशिंदे यांची मुंबईत भेट घेऊन मतदारसंघातील रखडलेल्या प्रश्नांबाबत निवेदन देऊन निधीची मागणी केली.
माढा शहरातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता प्रलंबित पाणीपुरवठा योजनांना तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणे. माढा शहरात भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी १० कोटी निधी मंजूर करावा. श्रीपुर-महाळुंग नगरपंचायतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी जागा खरेदी व बांधकामासाठी ५ कोटी निधीची मागणी.
माढ्यातील मनकर्णा नदी परिसराचे सुशोभीकरण व घाट बांधणीसाठी १० कोटी निधीची मागणी करण्यात आली. तसेच माढा नगरपंचायतीसाठी नवीन प्रशासकीय इमारत आणि सुसज्ज सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी १० कोटीच्या निधीची यावेळी मागणी करण्यात आली.
दरम्यान या सर्व मागण्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन माढा मतदारसंघाला भरघोस निधी देण्याचे सांगितले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.



















