सांगोला – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कामाला लागावे, राज्यात नावलौकिक होईल असा शिक्षण विभागाने कारभार करावा अशा सूचना देत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत आल्यानंतर नतमस्तक होऊन सभापती पदभार स्वीकारला.
यावेळी त्यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षण विभागाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार यांनी शिक्षण विभागाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहावे. गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. फक्त कागदोपत्री काम नको, प्रत्यक्ष निकाल दिसला पाहिजे.
प्राथमिक शाळांचा पट वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील रहावे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन कल्पना अंमलात आणाव्यात. आदर्श शाळा, गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांना पाठबळ द्यावे अशा सूचना देत शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान चेतनसिंह केदार सावंत यांनी गुरुवारी जि.प.प्रा.शाळा सांडसमळा वाढेगाव, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाढेगाव व आंधळगाव या ठिकाणी भेटी देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा, तपासणी यंत्रणा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींची सखोल पाहणी करण्यात आली. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने सेवा मिळावी, यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करावे आणि कोणत्याही रुग्णाला उपचाराविना परत पाठवू नये, असे निर्देश पाहणीत सभापती चेतनसिंह केदार यांनी दिले.



















