वेळापूर – नगरीचे आराध्य दैवत असलेल्या अर्धनारी नटेश्वराच्या यात्रोत्सवात दरवर्षी भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळतो. देशभरात एकमेव मानले जाणारे अर्धनारी नटेश्वराचे मंदिर वेळापूर येथे असून येथे स्वयंभू स्वरूपात महादेव व पार्वती यांची एकत्रित मूर्ती प्रकट झालेली आहे. त्यामुळे या देवस्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्धनारी नटेश्वराचा हळदी समारंभ, विवाह सोहळा, देवाचे साडे तसेच देवाची सोळावी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या भक्तिभावात करण्यात आले. या उत्सवांना हजारो भाविक उपस्थित राहून अर्धनारी नटेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेतात.
यामधील विशेष आकर्षण ठरणारा देवाचा साडे कार्यक्रम मध्यरात्री बारा वाजता भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडतो. मानाच्या सर्व कावडी देवाच्या दारात दाखल झाल्यानंतर अर्धनारी नटेश्वराला साडे लावण्याचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. त्यानंतर देवाची मानाची पालखी वेळापूर नगरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघते. या पालखीला तरुण भाविक खांद्यावर घेत “हर हर महादेव” आणि “अर्धनारी नटेश्वर महाराज की जय” अशा जयघोषात संपूर्ण नगरीतून प्रदक्षिणा पूर्ण करतात. यावेळी वातावरण पूर्णतः भक्तिमय झालेले असते.
या वर्षी देवाच्या पालखीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे स्थानिक तरुणांनी स्वतःच्या कष्टाने तयार केलेली सुंदर पालखी. देवाचे पुजारी गौरीहर गुरव, सतीश गुरव व रविराज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी तब्बल एक महिना परिश्रम घेऊन ही आकर्षक व देखणी पालखी तयार केली. पालखीतील कलाकुसर, सजावट आणि भक्तिभाव यामुळे भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या पालखी निर्मितीत अभिराज होडगे, वैभव वाघे, ओंकार होडगे, ऋषी साठे, अविनाश खराडे, बाळू खंडागळे, करण उरणे, पार्थ करमळकर, मयूर गुरव, प्रणव गुरव, कार्तिक गुरव, गणेश म्हेत्रे, विनोद रणवरे, अतुल गोडसे, गणेश लावंड, तेजस जवंजाळ, पप्पू पिसे, सोहम वाघे यांसह रॉयल इव्हेंट डेकोरेटर टीम वेळापूरचे अनिकेत शिंदे, रोहन भानवसे, संजय जाधव, शंकर राऊत, अनिल घाडगे यांनी विशेष योगदान दिले.
तसेच डॉ. अमोल घोरपडे, संजय उरणे, विश्वकर्मा बनकर, गणेश बनकर, हनुमंत उघडे, सचिन फडतरे, विष्णू फडतरे, गणेश शिनगारे, सतीश गुरव, रविराज गुरव आदींनीही या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
या आकर्षक पालखीमधील अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणांच्या या भक्तीपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून परंपरेची ही सुंदर परंपरा पुढील पिढी जपत असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
















