सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील ऐतिहासिक भीम जयंती मिरवणूक यंदा रविवार, दि. १९ एप्रिल रोजी एकजुटीने काढण्याचा निर्णय सर्व समाजबांधवांनी घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे धम्मरक्षिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
शहरात दोन मध्यवर्ती मंडळे अस्तित्वात असली, तरी मिरवणूक मात्र एकाच दिवशी व एकोप्याने काढण्यावर सर्वांनी एकमत दर्शवले. डॉ. बाबासाहेबांच्या काळापासून सुरू असलेली ही मिरवणूक सोलापूरची ऐतिहासिक परंपरा मानली जाते. या भव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि परदेशातूनही हजारो अनुयायी दरवर्षी उपस्थित राहतात. बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या प्रवास नियोजनाचा विचार करून परंपरेनुसार रविवारीच मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा मिरवणूक शिस्तबद्ध आणि नियमांच्या चौकटीत पार पाडण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजेच्या आवाजाची मर्यादा काटेकोरपणे पाळली जाणार असून, कोणत्याही प्रकारचे नियमभंग होणार नाही याची दक्षता मंडळांकडून घेतली जाणार आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक मंडळाला अभिवादनासाठी केवळ १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर मिरवणूक पुढे सरकवणे बंधनकारक राहणार आहे, असा निर्णय घेण्यात आला.
परंपरेची जपणूक करताना शिस्त आणि एकजूट यांचा आदर्श ठेवणारी ही मिरवणूक यंदा अधिक सुबक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बैठकीस आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, रॉकी बंगाळे, दशरथ कसबे, विकी शेंडगे, पिंटू डावरे, सागर उबाळे, सिद्धेश्वर पांडगळे, अजित बनसोडे, नागेश इंगळे, सुहास सावंत, ॲड. जयप्रकाश भंडारे, आयाज दिना, अजित गादेकर, आशुतोष नाटकर, बाळासाहेब बनसोडे, चंद्रकांत सोनवणे, श्रीमंत जाधव यांसह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.





















