सोलापूर : येथील मेगास्टार के. चिरंजीवी फॅन्स असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महापालिका मालमत्ता कर विभागातील निरीक्षक अरविंद दोमल यांच्या पत्नी ललिता दोमल यांचे नुकतेच निधन झाले. या निधनाबद्दल खुद्द तेलुगू चित्रपटसृष्टीचे मेगास्टार तथा माजी केंद्रीयमंत्री चिरंजीवी यांच्या आदेशावरून ऑल इंडिया मेगा फॅन्सचे प्रेसिडेंट तथा हैद्राबाद येथील मेगास्टार चिरंजीवी ब्लड बँकेचे इन्चार्ज आर. स्वामीनायडू यांनी रविवारी सोलापुरात येऊन अरविंद दोमल यांचे सांत्वन केले.
अरविंद दोमल त्यांच्या पत्नी ललिता यांचे 29 मार्च रोजी अल्प आजाराने निधन झाले होते. तत्पूर्वी त्या आजारी असताना गत महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती जेव्हा खालावत गेली त्यावेळी मेगास्टार चिरंजीवी यांना ही बाब कळविण्यात आली. त्याची तातडीने दखल घेत मेगास्टार चिरंजीवी यांनी हैदराबाद किंवा मुंबई येथे ललिता दोमल यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात तयारी दर्शवली.
यासंदर्भातील प्रयत्न सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी ललिता दोमल यांचे सोलापुरात निधन झाले. निधनाची वार्ता समजताच मेगास्टार चिरंजीवी यांनी मोबाईलवरून संपर्क साधत अरविंद दोमल व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या पार्श्वभूमीवर मेगास्टार चिरंजीवी यांनी अरविंद दोमल यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वन करण्यासाठी ऑल इंडिया मेगा फॅन्सचे प्रेसिडेंट तथा हैद्राबाद येथील मेगास्टार चिरंजीवी ब्लड बँकेचे इन्चार्ज आर. स्वामीनायडू यांना रविवारी सोलापुरात जाण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्वामीनायडू यांनी रविवारी अरविंद दोमल यांच्या भद्रावती पेठ येथील निवासस्थानी भेट देऊन दोमल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
याप्रसंगी विशाल दोमल, चेतन दोमल आदी दोमल कुटुंबीय तसेच बुचपती आडम, बालाजी कन्ना, वेणुगोपाळ उत्तुर, नारायण चिलवेरी, नागराज अडाकुल आदी उपस्थित होते.


















