सोलापूर – सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती करण्याच्या उद्देशाने समाजकल्याण विभागाच्या वतीने ९ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘समता सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असून, नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे, अशी माहिती समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या दालनात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सातपुते म्हणाल्या, समता सप्ताहाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन, व्याख्याने, चर्चासत्रे आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, समाजकल्याण विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर संविधान उद्देशिकेचे वितरण केले जाणार आहे. यामुळे नागरिकांना संविधानातील मूलभूत मूल्यांची ओळख होऊन सामाजिक समतेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या सप्ताहादरम्यान महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे. सामाजिक सलोखा, बंधुता आणि समानतेचा विचार रुजवण्यासाठी विविध स्पर्धा, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.
सभापती संस्कृती सातपुते यांनी सांगितले की, समता सप्ताह हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा एक प्रभावी प्रयत्न आहे. प्रत्येक घटकापर्यंत संविधानाचा संदेश पोहोचवणे ही समाजकल्याण विभागाची जबाबदारी असून, त्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. समता सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये एकात्मता, समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रसार होऊन अधिक समताधिष्ठित समाज घडवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चौकट
समाजकल्याण विभागाचा घेतला आढावा
समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती सभापती संस्कृती सातपुते यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून घेण्याचे कामकाज करत आहेत. त्यामध्ये दिव्यांग कल्याण योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, दलीत वस्ती सुधारणा योजना, यांसारख्या विविध योजनांचा आढावा घेतला आहे. या सर्व योजनांची सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली.
समिती सदस्यांच्या निवडीसाठी अनेकजण इच्छुक
जिल्हा परिषद विषय समिती सदस्य निवडीचे सर्व अधिकार गटनेत्या रश्मी बागल अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्याकडे दिले असले तरीही समाजकल्याण समितीच्या सदस्यपदी आपली निवड व्हावी यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये महिला तसेच मागासप्रवर्ग यासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार असून मात्र याबाबत पक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही सभापती सातपुते यांनी सांगितले.























