सोलापूर : आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘एकल महिला दिन’ कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला.यावेळी एकल महिलांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाची कथा मांडली. आपल्या आयुष्यातील अडचणी, सामाजिक संघर्ष आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. काही महिला भावना व्यक्त करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
महापालिकेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, उपायुक्त सोनाली यादव, महिला व बालकल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात १५ एकल महिलांचा सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला. संघर्षमय परिस्थितीतही स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.एकल महिलांच्या वेदना, संघर्ष आणि जिद्दीला सलाम करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिलेल्या आधाराबद्दल महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली.उपस्थित महिलांनी अशा उपक्रमांमुळे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळत असल्याचे सांगत महापालिका प्रशासन व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचे आभार मानले.यावेळी रंजीता चाकोते यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात उपमहापौर देवकर यांनी महिलांना धीर देत, तुम्ही एकट्या नाही, तुमच्या प्रत्येक सुख-दुःखात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देत एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या समस्या व सूचनांची नोंद घेऊन त्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
Post Views: 35