सोलापूर – नो डीजे, नो डॉल्बी ही योजना सोलापूर जिल्ह्यात राबविण्याबाबत कार्तीकेयन एस. जिल्हाधिकारी व अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी आग्रही भुमिका मांडली. शांतता समिती सदस्यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी नो डीजे नो डॉल्बी ही योजना राबवत असल्याचे आश्वासन देत नो डीजे, नो डॉल्बी ही शपथ सुध्दा घेतली आहे.
दिनांक १४/०४/२०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच सामाजिक सलोखा दृढ करणे या उद्देशाने दि. ०८/०४/२०२६ रोजी कार्तीकेयन एस. जिल्हाधिकारी सोलापूर व अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकी करीता जिल्हयातील सर्व शांतता समितीचे सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, डॉल्बी धारक, प्रतिष्ठीत व्यक्ती व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. सदर बैठक ही संवाद हॉल, पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे घेण्यात आली.
या बैठकीमध्ये जिल्हा शांतता समितीच्या काही सदस्यांनी आपल्या सुचना मांडुन आपले मनोगत व्यक्त केले. डॉल्बी सिस्टीममुळे होणारे धोके, व त्यामुळे लहान मुले, वृध्द यांचे मानसिक व शारीरीक, होणारे परिणाम तसेच ध्वनीप्रदुषणामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यांची माहिती दिली तसेच ध्वनीप्रदुषण कायदयाचे/नियमांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत सुचना ही दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढावी, गणेशोत्सवापासून आतापर्यंत झालेल्या सर्व जयंती व उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा डीजे व डॉल्बी लावण्यात आलेला नसून सोलापूर जिल्हा हा पुर्णपणे डीजे व डॉल्बी बंद केलेला महाराष्ट्रातील प्रथम जिल्हा आहे याबाबत माहिती दिली. ज्या मंडळाकडून मिरवणुकीमध्ये डीजे व डॉल्बी चा वापर करण्यात येईल अशा ठिकाणी ध्वनी मापक यंत्रामधून ध्वनी प्रदुषाणाची पातळी मोजण्यात येईल व ही ध्वनी प्रदुषाणाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असणा-या मंडळावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले.
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हयातील पोलीस अधिकारी, सर्व शांतता समितीचे सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, डॉल्बी धारक, प्रतिष्ठीत व्यक्ती हजर होते. सदर मिटिंगचे सुत्रसंचालन पोनि बाळासाहेब भरणे व आभार पोनि संजय जगताप यांनी मांडले.



















