बार्शी – शिवशक्ती बँकेची ३१ मार्च २०२६ पर्यंत थकबाकी शून्य टक्के झाली असल्याने बॅंकेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगूटे यांनी बोलताना सांगितले की, गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील काही बँकांवर रिझर्व बँकेची अचानक कारवाई झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व को-ऑपरेटिव्ह बॅकावर अडचणी आल्या होत्या. ठेवीदार गडबडुन गेल्याने व काही अफवा पसरल्याने त्याचा परिणाम आपल्या बँकेवरही झाला होता.
बँकेची स्थापना १९९९ ची असून बँकेचे कार्यक्षेत्र हे सोलापूर व धाराशिव जिल्हा असून २५ वर्षांपासून सर्वसामान्यांची बँक, तत्पर सेवा, ठेवीदाराचे हित जोपासत कार्यरत आहे. सहकारी बँकिग क्षेत्रासाठी सध्या कठीण स्थिती असताना मार्च २०२६ अखेर बँकेच्या अथक प्रयत्नातून चांगले निकष आले आहेत. सर्वांच्या सहकार्याने आपल्या बँकेचा निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के तर सीआरएआर ९.१६% आणि ठोबळ नफा ३.६९ कोटी झालेला आहे. तसेच बँक डीआयसीजीसीकडे ठेवीचा संरक्षण विमा हप्ते नियमित भरत आहे. बँकेचे मार्गदर्शक डॉ. बी. वाय. यादव, चेअरमन डॉ. प्रकाश बुरगूटे, संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने शून्य टक्के एन.पी.ए. आणण्याचे ध्येय पुर्ण केले आहे. बँक ही सर्वसामान्य जनतेची असुन यापुढेही शाखा विस्तार, ठेवीदाराचे हित, व्यावसायिकांना कर्ज रुपाने आर्थिक मदत करण्यास तप्तर राहणार आहे. बँकेस श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, सर्व सहकारी पतसंस्था, शहरातील सहकारी, सरकारी बँका यांनी सहकार्य केले. तसेच सर्व सभासद, ठेवीदार व कर्जदार यांचे विश्वासाला बँक कधीही तडा जाऊ देणार नाही व बँकेने सर्व तंत्रज्ञानाचा सविस्तर वापर करुन ग्राहकांना जास्तीत जास्त जलद सेवा देवून तितक्याच जोमाने काम करुन बँक प्रगतीपथावर ठेवण्याचे काम चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वचनबध्द राहील, असे यावेळी बोलताना डॉ. बुरगूटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेस बॅंकेचे मार्गदर्शक डॉ. बी. वाय. यादव, चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, व्हाईस चेअरमन मोरे, संचालक मंडळ, सरव्यवस्थापक भारत उमाटे, सहा. सरव्यवस्थापक गणेश बारंगुळे, शाखाधिकारी समाधान राऊत, विजय शिखरे व पदाधिकारी उपस्थित होते.

















