बार्शी – उपळे दुमाला येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात जि प शाळा मुले येथील सहशिक्षक श्री नागनाथ शेरकर यांना बार्शी तालुका पंचायत समिती यांचेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल विद्यालयात नागनाथ शेरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तकांचा संच भेट देऊन सत्कार करण्यात आला.
मंगळवार ७ एप्रिल रोजी सकाळी विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी आदर्श शिक्षक नागनाथ शेरकर, केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक हनुमंत सोनवणे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांचे हस्ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दयानंद रेवडकर सर यांच्या हस्ते नागनाथ शेरकर आणि केंद्रप्रमुख हनुमंत सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नागनाथ शेरकर यांनी सत्कार स्वीकारताना कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या या विद्यालयातून माझे शिक्षण झाले. ज्या विद्यालयात शिक्षण घेतले त्याच विद्यालयाकडून माझा सत्कार होणे हे मी भाग्याचे समजतो. मी जो काही आज आहे ते माझी आई आणि माझे गुरुजन यांनी केलेल्या संस्कारामुळेच मी अंधश्रद्धा मानत नाही. परंतु माझी श्रद्धा माझे आई वडील गुरुजन आणि माजी विद्यार्थी यांची वर नक्की आहे अशी भावना व्यक्त केली.
यावेळी केंद्रप्रमुख आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल.एन. महाले यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर आर लंकेश्वर यांनी तर आभार रेवणसिद्ध दुलंगे यांनी मानले.

















