बार्शी – तालुक्यातील पानगांव येथे स्वराज्याचे ५ वे छत्रपती रामराजे महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका नूतन इमारतीचे लोकार्पण व अभ्यासिकेतून शासन सेवेत निवड झालेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला.
पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमंत दर्याबाई साहेब नाईक-निंबाळकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका चालविण्यात येत आहे. पूर्वी खाजगी जागेत सुरु असलेल्या या अभ्यासिकेस ग्रामपंचायतीच्यावतीने नूतन इमारत उभारुन देण्यात आली असून, त्या इमारतीचे लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या अभ्यासिकेच्या माध्यमातून गेल्या दशकात पानगावांतील २५ पेक्षा अधिक तरुण-तरुणींनी विविध शासकीय सेवांमध्ये यश संपादन केले असून, त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील ऐतिहासिक वारसा जसे की गाव-वेस, समाधी वास्तू आणि अष्टकोनी हत्ती तलाव यांच्या जतन व संवर्धनासाठी ग्रामस्थांनी यावेळी एकमुखाने निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून अमोल ताकभाते (गटविकास अधिकारी, धाराशिव) उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य नंदकुमार काळे, सरपंच जयसिंगराव देशमुख प्रकाश मोरे (पोलीस निरीक्षक, मुंबई), ओमकार गायकवाड (गटविकास अधिकारी, वाशी), प्रदीप झालटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, बार्शी), प्राचार्य आनंद कसबे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद पाटील (पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर) यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत मोरे व गणेश खंदारे यांनी तर आभार प्रदर्शन देवा काळे यांनी व्यक्त केले.

























