सोलापूर : शहर हद्दवाढ भागातील १२८ खासगी शाळांच्या प्रशासकीय बाबींचे अधिकार सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर सर्व मुख्याध्यापकांची पहिली सर्वसमावेशक सहविचार सभा शुक्रवारी कॅम्प शाळा, लष्कर येथे पार पडली.
या बैठकीत शालेय शिक्षणाशी संबंधित विविध विषयांवर नियंत्रण अधिकारी तथा मुख्यलेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर , महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच शिक्षक व शाळांच्या प्रशासकीय अडचणी तातडीने सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या पुढाकारातून हद्दवाढ भागातील १२८ शाळांचे प्रशासकीय अधिकार महापालिकेकडे आले असून, या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी प्रास्ताविक करत शिक्षण मंडळ स्तरावर शिक्षकांचा कोणताही प्रश्न प्रलंबित ठेवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
बैठकीत यू-डायस (UDISE) प्रमोशन, शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण, आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया, शाळेची फी, विद्यार्थी वाहतूक, दप्तराचे ओझे, केंद्र व राज्य शासनाच्या विद्यार्थीहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शालेय पोषण आहार (एमडीएम), व्हीएसके पोर्टल, संचमान्यता, आरटीई मान्यता नूतनीकरण, विद्यार्थी सुरक्षितता, ‘निपुण महाराष्ट्र’ अभियान, जयंत नारळीकर अध्ययन-अध्यापन उपक्रम तसेच पीजीआय (PGI) कार्यपद्धती आदी विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक मल्लिकार्जुन हिरेमठ, लेखापाल महेश वालावलकर, विषय साधन व्यक्ती सुवर्णा गुरव, श्रीमती कदम तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भविष्यातही महापालिकेमार्फत
सर्वतोपरी सहकार्य केले जाईल : डॉ. जवळगेकर
नियंत्रण अधिकारी तथा मुख्यलेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी मुख्याध्यापकांच्या अडचणी जाणून घेत त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. भविष्यातही महापालिकेमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. महापालिकेकडे शाळांचा समावेश झाल्याबद्दल हद्दवाढ भागातील मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले.
Post Views: 19