सोलापूर : आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर यांच्या सहकार्याने “फौजदारी न्यायप्रणालीतील पोलिसांची भूमिका” या विषयावर कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम आज शुक्रवारी पोलीस आयुक्तालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा उद्देश कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, फौजदारी न्यायप्रणालीतील पोलिसांची जबाबदारी, नागरिकांचे हक्क, न्यायप्रक्रियेतील विविध घटकांची भूमिका तसेच कायद्याचे राज्य अधिक सक्षम करण्याबाबत जनजागृती करणे हा होता.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन न्यायमुर्ती अमोलकुमार देशपांडे, सचिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी न्यायप्रक्रीया सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांना कायदेशीर सहाय्याचा लाभ दयावा असे आवाहन केले. तसेच वक्ते म्हणुन जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर चे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी फौजदारी न्यायप्रणालीमध्ये पोलिसांची भूमिका, गुन्ह्यांच्या तपासाची प्रक्रिया, पुरावे संकलन, न्यायालयीन कार्यवाहीतील पोलिसांचे कर्तव्य तसेच नागरिकांनी कायद्याचे पालन करून न्यायव्यवस्थेला सहकार्य करण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे मार्गदर्शनात पार पडला . कार्यक्रमात पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील,पोलीस उपायुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, सहायक पोलीस आयुक्त (विभाग-2) विजयालक्ष्मी कुर्री व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी, विधी क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. उपस्थितांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध कायदेविषयक प्रश्नांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर यांनी संयुक्तरीत्या परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावाना पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी केली . शेवटी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोनी राजेश डाकेवाड यांनी केले व नियोजन दोषसिध्दी कक्ष सोलापुर यांनी पाहिले.
Post Views: 14