माढा : माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेत बुधवारी राष्ट्रीय अविष्कार अभियान उपक्रमांतर्गत (एक्सपर्ट टॉक) सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील व माढा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवलदार तसेच आयर्न मॅन पुरस्कार प्राप्त अमृत खेडकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला विद्यार्थ्यांनी मोठी हजेरी लावत उत्तम प्रतिसाद दिला. खेडकर यांनी नुकतेच केंद्र सरकारच्या फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सायकल स्पर्धेचे ४२५० कि मी अंतर अवघ्या १६ दिवसात पार केले होते. या आधीही त्यांनी अनेक स्पर्धेत सहभाग नोंदवून कष्ट व चिकाटीच्या जोरावर स्पर्धेतील आव्हान पूर्ण करून विजय प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे जिद्द चिकाटी तसेच शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असाल तर कोणतेही कार्य आपण पूर्ण करू शकतो त्याचे उदाहरण दिले आहे.
माढा प्रशालेतील विद्यार्थ्यांना सायकलिंग स्पर्धेत आलेला अनुभव आपल्या मार्गदर्शनातून सांगितला. तसेच शालेय जीवनात शारीरिक दृष्ट्या विद्यार्थ्यांनी कसे सक्षम राहावे आपला आहार कसा असावा व्यायाम आणि जिज्ञासा वृत्ती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील तेवढाच उत्तम प्रतिसाद देत त्या गोष्टी ऐकून घेतल्या. अनेक विद्यार्थ्यांनी सायकल स्पर्धेतील प्रवास त्यातील अनुभव व सायकल विषयी अनेक प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी आवडीने विचारलेल्या प्रश्नाला तितक्याच सहजतेने उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले.
याप्रसंगी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक नागेश खेडकर यांनी त्यांचा सन्मान व सत्कार केला. या मार्गदर्शन कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धैर्यशील भांगे सदस्य प्रवीण पवार माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष शेखर म्हेत्रे प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक नागेश खेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन किरण शेलार व आभार पूजा भोसले यांनी मानले.


























