सोलापूर: ‘इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग’च्या १६ व्या पर्वात गुरुवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये ‘रॉयल्स’ आणि ‘ गुलमोहर के.के.’ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (रेल्वे मैदान) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल्सने १५ षटकांत २ बाद १५९ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये सचिन वांगीकर (४६ धावा) आणि महेश आरनाळ (४३ धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना मॉडर्नचा संघ १४.२ षटकांत १०९ धावांत सर्वबाद झाला. प्रमोद मंगलपल्लीने भेदक गोलंदाजी करत ४ बळी घेतले, ज्यामुळे रॉयल्सने हा सामना ५१ धावांनी जिंकला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात गुलमोहर के.के. संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि १५ षटकांत ७ बाद १०८ धावा केल्या. प्रेम राठोडने ६२ धावांची झंझावाती खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना शिवशंभू संघाला १५ षटकांत ७ बाद १०१ धावांपर्यंतच मजल मारता आली. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात गुलमोहर संघाने ७ धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक:
- रॉयल्स: १५ षटकांत २ बाद १५९ धावा. (सचिन वांगीकर ४६, महेश आरनाळ ४३, बालाजी बोल्ली ३६. गोलंदाजी: अंबादास तोरा १/१६, अब्दुल पिरजादे १/२६) विजयी विरुद्ध मॉडर्न: १४.२ षटकांत सर्वबाद १०९ धावा. (अंबादास तोरा १८, हाजी तांबोळी १८, युनूस खान १६. गोलंदाजी: प्रमोद मंगलपल्ली ४/१८, प्रशांत भट्ट १/५). सामनावीर: प्रमोद मंगलपल्ली
- गुलमोहर के.के.: १५ षटकांत ७ बाद १०८ धावा. (प्रेम राठोड ६२, संदीप लटवकर १५. गोलंदाजी: अनिरुद्ध अक्कलकोटी ४/२३, अनिल पटेल १/२४) विजयी विरुद्ध शिवशंभू: १५ षटकांत ७ बाद १०१ धावा. (संदीप वाघमारे २६, अनिरुद्ध अक्कलकोटी २६, अनिल पटेल २१. गोलंदाजी: प्रेम राठोड १/२४, प्रेम सानुपुर १/२१)सामनावीर: प्रेम राठोड (६२ धावा आणि १ बळी).
























