सांगोला – सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष महादेव गायकवाड, प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख उपस्थित होते.
सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वैष्णवी भोसले, समीक्षा लिगाडे, शितल सावंत, सानिका गरंडे, सानिका साळुंखे, शुभम स्वामी, नम्रता खटकाळे, साक्षी गायकवाड, पूजा गायकवाड या विद्यार्थ्यांनी मनोगतात संस्थेत घालवलेल्या वर्षांतील अनुभव सांगितले आणि प्राध्यापकांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख प्रा.पी.जी.पवार यांनी यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते तर सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा असतो. आयुष्यात अडचणी येतील, अपयशही येईल, पण त्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकून पुढे जाणे हेच खरे यश आहे असा सल्ला दिला. महादेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या पुढील जीवनासाठी मार्गदर्शन केले आणि संस्थेशी असलेले नाते कायम ठेवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माजी विद्यार्थिनी संजना येलपलेची महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाल्याबद्दल, सिव्हिल विभागातील शुभम टाकळेने कॅड वॉर या इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक तर श्रेयश भगतने उपविजेते पद प्राप्त केल्याबद्दल तसेच नम्रता खटकाळे, पूजा गायकवाड, समृद्धी काळुंखेनी ब्रिज मेकिंग या इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रणजीत देशमुख, सूत्रसंचालन प्रा.संदीप बावचे यांनी केले.





















