बार्शी – नगरपरिषदेच्या शुक्रवार, दि.११ एप्रिल रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा उभारण्यास सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सर्वानुमते मंजुरी दिली. शहर न्यायालयासमोरील विद्यमान पुतळ्याच्या जागी पुतळा पार्क येथे हा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून, आवश्यक शासन परवानग्या घेऊन पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सदर पुतळा ‘राज-विजय क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ’ यांच्या वतीने स्वखर्चातून उभारुन लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. हा विषय मंजुरीनंतर प्रेक्षक गॅलरीतून आंबेडकरप्रेमी जनतेकडून सभागृहात नगरसेवकांवर पुष्पवृष्टी करुन घोषणाबाजी करण्यात आली.
कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहात पार पडलेल्या या सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांनी भूषवले. मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
सभेत एकूण २५ विषयांवर चर्चा झाली. पहिला विषय सर्वामताने मंजूर झाला असला, तरी इतर विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद, आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ पाहायला मिळाला.
विकासात पक्षपातीपणा –विरोधकांचा आरोप
विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी लातूर रोड परिसरात वारंवार निधी खर्च होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. विरोधकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. नगराध्यक्ष आमच्या प्रश्नांना प्रतिसाद देत नाहीत. विकासासाठी आम्हीही मुख्यमंत्री देवाभाऊंकडे जाऊ शकतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी सभागृहात केले.
विषय क्रमांक १३ वरील चर्चेत अक्कलकोटे यांनी एका कामाच्या अंदाजपत्रकात १ कोटी ४१ लाख रुपये मंजूर असताना तेच काम ६९ लाखांत पूर्ण कसे झाले, असा सवाल उपस्थित केला. जनतेच्या कररुपी पैशांचा वापर पारदर्शकपणे व्हावा,अशी मागणी त्यांनी केली.
सभागृहाच्या पटलावरील चर्चांचे प्रोसिडिंग होत नसून, त्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचाही आरोप त्यांनी केला.
सत्ताधारी गटाचे विजय राऊत यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत, बार्शी शहराचा समतोल विकास आमचा उद्देश आहे. मागील काळात सर्व प्रभागांत कोट्यवधींची कामे केली आहेत, असे स्पष्ट केले. तसेच पुढील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्याचे आश्वासन दिले. विरोधकांना त्यांच्या सत्ता काळातील कारभाराची आठवण करुन देताना राऊत म्हणाले की, विरोधक म्हणून आम्हींसुद्धा विकासासाठी नगरपरिषदेच्या पायऱ्यांवर वेळोवेळी आंदोलन केले आहे.
विषय क्रमांक ११, १३, १४ व १६ वर मतदानावेळी विरोधकांनी विरोध नोंदवला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. अनेकवेळा सभागृहातील वातावरण तणावपूर्ण व गंभीर झाले.
सभेदरम्यान नगरसेवक कृष्णराज बारबोले हे बोलण्यासाठी उभे राहिल्यावर सत्ताधारी नगरसेवकांकडून त्यांना वारंवार अडविण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या प्रकारामुळे सभागृहाची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा रंगली.
नगरसेविका विद्या बंगाळे व सरस्वती भानवसे यांनी कचरा डेपोवरील पूर्वीच्या खर्चाचा तपशील न देता नव्या खर्चावर आक्षेप घेतला. यावेळी विद्या बंगाळे यांनी या प्रकरणी उपोषणाचा इशाराही दिला.
सभेतील सर्वानुमते घेतलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला असला, तरी इतर विषयांवर झालेल्या गदारोळामुळे बार्शी नगरपरिषदेतील राजकीय वातावरण तापल्याचे स्पष्ट झाले.
आजच्या सभेतील चर्चेत उपनगराध्यक्ष रोहित पाटील संदेश काकडे, अमोल चव्हाण, भारत पवार, नवनाथ माळगे, विद्या बंगाळे, सरस्वती भानवसे, क्षमा रिकीबे, चांगुना जाधव यांनी सहभाग घेतला.






















