बार्शी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्यावतीने आज रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता रुट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
हा रुट मार्च शिवसृष्टी, भीमनगर, सिद्धार्थनगर, हांडे गल्ली, कोर्ट चौक, तानाजी चौक मार्गे पुन्हा शिवसृष्टीपर्यंत काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरुन काढण्यात आलेल्या या रुट मार्चमुळे नागरिकांना जयंती उत्सव शांततेत पार पाडण्याचा संदेश देण्यात आला.
या रुट मार्चचे नेतृत्व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्यासह पोलीस अंमलदार व होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जयंती उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच उत्सव शिस्तबद्ध व शांततेत पार पडावा यासाठी हा रुट मार्च काढून, संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दंगा काबू योजना राबविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना डीजे व डॉल्बीमुक्त जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सामाजिक सलोखा राखत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जयंती उत्सवाच्या काळात विनापरवाना कमानी उभारण्यास मनाई करण्यात आली असून, सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.























