सोलापूर : आजच्या काळात विवाह सोहळा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते लाखो रुपयांचे खर्च, डीजेचा आवाज आणि भव्य सजावट. मात्र, या सर्व दिखाव्याला फाटा देत सोलापूर जिल्ह्यातील एका नवदाम्पत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजासमोर एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. शुभम मिसाळ आणि धनश्री सुर्वे या दांपत्याने आपला विवाह सोहळा बालकाश्रम व वृद्धाश्रमात साजरा करत सामाजिक संवेदनेचा परिचय करून दिला आहे.
शुभम आणि धनश्री या दोघांचेही शिक्षण ‘सामाजिक कार्य’ (MSW) या विषयात झाले आहे. आपल्या शिक्षणाचा आणि विचारांचा वारसा त्यांनी केवळ पुस्तकी न ठेवता प्रत्यक्ष आयुष्यात उतरवला. मोरवंची येथील प्रार्थना फौंडेशन संचलित बालकाश्रम आणि वृद्धाश्रमात हा विवाह सोहळा पार पडला. वंचितांच्या सहवासात लग्नगाठ बांधून त्यांनी “विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर समाजाशी नातं जोडणारा संस्कार आहे” हा संदेश दिला.
दोन मुलांचे शैक्षणिक पालकत्व: लग्नात भेट म्हणून मिळालेली सर्व रक्कम त्यांनी बालकाश्रमातील एका मुलाच्या आणि एका मुलीच्या शिक्षणासाठी अर्पण केली. या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा संकल्प या दांपत्याने केला आहे.
लग्नाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड म्हणजे एक जीवन” हा संदेश देत त्यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली. वृद्धाश्रमातील निराधार आजी-आजोबांसोबत वेळ घालवून त्यांना आपुलकीची भेट दिली, तर बालकाश्रमातील चिमुकल्यांसोबत लग्नाचा आनंद वाटून घेतला.
या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला प्रसाद मोहिते, अनु मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्रा. विशाल गरड यांनी विशेष उपस्थिती लावून या उपक्रमाचे कौतुक केले. समाजात बदल घडवायचा असेल तर तो स्वतःपासून सुरू करावा लागतो, हे या नवदाम्पत्याने सिद्ध केल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


























