सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर येथे “विश्वरत्न औषधीवनाची सुरुवात करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृह समोरील परिसरात बॉटनिकल गार्डन उभारणीचा शुभारंभ करण्यात आला असून, या उपक्रमाला “विश्वरत्न वन” असे नामकरण करण्यात आले.
यावेळी बोधीवृक्ष (पिंपळ) रोप लावून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच विविध देशी व औषधी वनस्पतींची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरण रक्षक उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते या बॉटनिकल गार्डन निर्मितीची सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी नगरसेवक सत्यजित वाघमोडे, विशेष कार्यकारी अधिकारी महेश देवकर, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, वस्तीगृह अध्यक्षा मनीषा जगताप, राम हुंडारे, सिद्धार्थ भडकुंबे, मोहन कांबळे आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.जयंतीनिमित्त १३५ रोपांची लागवड करून अभिवादन करण्यात आले.
यापूर्वीपासूनच इको नेचर क्लब यांच्या पुढाकारातून प्रशासन तसेच पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमी यांच्या समन्वयातून वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी राहत आहे. शासनाच्या वनधोरणानुसार वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून इको क्लब ची स्थापना देखील करण्यात आली. पुढील काळात या परिसरात ग्रीन पट्टा, बॉटनिकल गार्डन, वाचन कट्टा, सायकल ट्रॅक अशा विविध पर्यावरणपूरक सुविधा विकसित करण्यात येणार असून, या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांसह नागरिकांना होणार आहे.
—























