टेंभुर्णी – उजनी धरणाच्या पात्रातून यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर टेंभुर्णी पोलिसांनी टाकलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी ५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अवैध उत्खनन करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. ही कारवाई राहुल आत्राम, परी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, टेंभुर्णी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, मौजे अकोले (ता. माढा) शिवारातील उजनी धरणाच्या पात्रात एमआयडीसीच्या जुन्या जॅकवेल पाणीपुरवठा योजनेच्या पश्चिम बाजूस काहीजण यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करत आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार केले. त्यानुसार दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.२६ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान धरणाच्या पात्रात एका यांत्रिक फायबर बोटीत १० ते १२ ब्रास वाळू, मोठे पाईप आणि सेक्शन पंप असा संपूर्ण साहित्यसाठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या साहित्याची पाहणी केली असता त्यामध्ये ५७ हजार रुपयांची वाळू, ३ लाख रुपयांची फायबर बोट आणि २ लाख रुपयांचा सेक्शन पंप, असा एकूण ५,५७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईची चाहूल लागताच संबंधित बोट मालक आणि चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागालाही तातडीने पाचारण करण्यात आले. तहसीलदार संजय भोसले यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्राम महसूल अधिकारी शिवराज भरत पाटील, मंडलाधिकारी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जप्त साहित्य अधिकृतरित्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी शिवराज भरत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गोपनीय यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
═════════════
चौकट
“पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत. कायद्याला आव्हान देणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”
— राहुल आत्राम
परी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, टेंभुर्णी
═════════════
या कारवाईनंतर टेंभुर्णी शहरात आता वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. वाळू उपशावर पोलिसांनी कठोर कारवाई केली असली तरी शहरातील काही भागात अवैध दारू विक्री, मोबाईलवरून मटका, अमली पदार्थांची विक्री, प्रत्येक टपरी वरती भेसळयुक्त मावा आणि टेंभुर्णी शहरात जुगार अड्डे सुरू असल्याचे नागरिकांकडून सातत्याने बोलले जात आहे काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या दैनिकात बातमी प्रसिद्ध झाली की काही दिवसांसाठी कारवाई केली जाते; मात्र नंतर हेच अवैध धंदे पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र दिसते. मात्र यामध्ये अवैध्य धंदेवाले पत्रकारांना टार्गेट केल्याचे अनेक वेळा टेंभुर्णी घटना घडल्या आहेत
════════════
चौकट….
“वाळू माफियांवर कारवाई झाली, पण शहरात उघडपणे सुरू असलेल्या इतर अवैध व्यवसायांवर कायमचा लगाम कधी बसणार ?”
— टेंभुर्णीतील नागरिकांचा सवाल
═════════════
टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ठिकाणी तक्रार नोंदविण्यापासून ते मिटविण्यापर्यंत कथित मध्यस्थ सक्रिय एजंट असल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत राहुल आत्राम यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचा विस्तार शहरातील इतर अवैध धंद्यांपर्यंत होणार का, याकडे आता टेंभुर्णीकरांचे लक्ष लागले आहे. कारण शहर खऱ्या अर्थाने अवैध धंदेमुक्त झाल्याशिवाय नागरिकांना सुरक्षिततेचा मोकळा श्वास मिळणार नाही, अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.
राहुल आत्राम यांचा फोटो त्यांच्या वरील चौकट मध्ये वापरावा























