बार्शी – श्री भगवंत महोत्सवानिमित्त बार्शी येथे ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा भव्य आणि भक्तिमय कार्यक्रम पार पडला. या कीर्तनात “विष्णू माऊली” अद्यात्मिक मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवत वातावरण भक्तिरसाने भारुन टाकले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविताताई राऊत आणि नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या हस्ते शिवलीलाताई पाटील यांचे स्वागत करण्यात आले. कीर्तनादरम्यान बोलताना शिवलीलाताईंनी भगवंत महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “हा सोहळा अत्यंत सामर्थ्यवान असून बार्शीकर खरोखर भाग्यवान आहेत, कारण भगवंत स्वतः या भूमीत वास करतात. मी त्या बार्शीची आहे जी भगवंतांची बार्शी आहे.” त्यांनी संयोजकांचे आभार मानत, स्थानिक मुलीला आपल्या गावात कीर्तनाची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच त्यांनी समाजप्रबोधन करताना सांगितले की, घरात पोटची आणि परकी मुलगी असा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक दिली तरच भगवंताची कृपा लाभते. “देव सर्वत्र आहे, पण देवळात गेल्याशिवाय त्याची जाणीव होत नाही,” असे सांगत त्यांनी भक्तीचा खरा अर्थ स्पष्ट केला.
महिलांना उद्देशून त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांची शिकवण मुलांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या संस्कारांची आठवण करुन देत, जिजाबाई, रमाई, जनाबाई, मुक्ताबाई यांचे विचार अंगीकारण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
इतरांच्या प्रगतीवर मत्सर करणारा माणूस आयुष्यभर दुःख भोगतो, असे सांगत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच महिलांनी स्वतःच्या आचरणाचा विचार करावा, कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागावे आणि अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
एकादशी व्रताचे महत्त्व सांगताना त्यांनी दशमी, एकादशी आणि द्वादशी असे तीन दिवसांचे व्रत असल्याचे स्पष्ट केले. कीर्तनादरम्यान “पाऊले चालती पंढरीची वाट”, “विठ्ठल विठ्ठल”, “ज्ञानोबा माऊली” अशा अभंगांनी वातावरण भारावून गेले. टाळ, मृदुंगाच्या नादात उपस्थितांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कीर्तनात “पुंडलिकासाठी चंद्रभागेच्या तिरी थांबलेला श्रीहरी” यासारख्या कथा सांगत भक्तीभाव जागवण्यात आला. तसेच “विठोबा रुखमाई”च्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमात “जय श्रीराम” आणि भगव्या रंगावरील गीतांनीही रंगत आणली. बार्शी शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा आनंद लुटला.
शेवटी, “संकटाच्या काळात सर्व मार्ग बंद झाले तरी भगवंतच नवीन मार्ग दाखवतो,” असा संदेश देत त्यांनी आई-वडिलांचा सन्मान राखावा, व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले. कीर्तनानंतर मा. आमदार राजेंद्र राऊत व कविता राऊत यांच्या हस्ते शिवलीलाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
























