
सांगोला – तालुक्यातील राजुरी गावचे ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिर येथील लक्ष्मीदेवीच्या दगडी मुर्तीवरील सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली असल्याची घटना शुक्रवार दि.१९ जून रोजी रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार दि.१९ जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे राजुरी गावाचे ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिर येथे श्री लक्ष्मी देवीची पुजा, अर्चा करून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुजारी रमेश गुरव हे मंदिर बंद करून घरी गेले. शनिवार दि.२० रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते नेहमी प्रमाणे लक्ष्मीदेवीच्या मंदिराची झाडलोट, पुजा, अर्चा करणेसाठी गेले असता मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसल्याने आत देवीच्या गाभाऱ्यात जावुन पाहीले असता देवीच्या दगडी मुर्तीला असलेला चांदीचा मुखवटा दिसुन आला नाही. तसेच अधिक पाहणी केली असता देवीच्या अंगावरील मनी मंगळसुत्र दिसुन आले नाही. याबाबत त्यांनी गावातील लोकांना बोलावुन घडलेला प्रकार सांगितला. चोरीस गेलेल्या वस्तु बाबत मंदिरात आजु बाजुला पाहणी केली असता कोठेही मिळून आल्या नाहीत.
मंदिराच्या सीसीटिव्ही फुटेज मध्ये अनोळखी तीन इसमांनी देवीच्या अंगावरील दागिने चोरी करून घेवुन जात असताना दिसत आहेत.
याबाबत रमेश भगवान गुरव (वय-५२), व्यवसाय-मंदिर पुजारी, रा-राजुरी, ता.सांगोला, जि.सोलापुर यांनी २ लाख १५ हजार किंमतीचा अंदाजे एक किलो वजनाचा चांदीचा मुखवटा त्याला सोन्याचा मुलामा दिलेला व सोन्याचे डोळे, २२ हजार किंमतीचे काळ्या मन्यात ओवलेले सोन्याचे मनी मंगळसुत्र, ४ हजार किंमतीचा पितळी पंच धातुचा घोडा असा एकूण २ लाख ४१ हजार किंमतीचे चांदीचे व सोन्याचे दागिने सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेले तीन अनोळखी चोरट्यांनी माझे समंती वाचुन मुद्दाम लबाडीने चोरुन नेली आहे अशी तक्रार सांगोला पोलीस ठाणे येथे दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 27