बार्शी – श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बार्शी यांच्यावतीने गरजू शालेय विद्यार्थ्यांना वही, पुस्तके व दप्तर वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मान्यवर, पालक, शिक्षक व स्वामीभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. पी. टी. पाटील हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रतापराव जगदाळे तसेच ढाळे पिंपळगाव येथील श्री. दत्त महाराज उपस्थित होते.
मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर संस्थेचे सचिव श्री. शिंदे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रतापराव जगदाळे आणि दत्त महाराज यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या ‘एकमेकास सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ’ या ब्रीदवाक्यानुसार मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वही, पुस्तके व दप्तरांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
अध्यक्षीय भाषणात श्री. पी. टी. पाटील यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तसेच समाजातील सक्षम घटकांनीही अशा कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरळीत पार पडले. शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. “विद्यादान हे श्रेष्ठ दान आहे” या भावनेतून संस्था भविष्यातही अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Post Views: 223