सोलापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार आणि आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी हिवताप योजना व जिल्हा हिवताप कार्यालय पंढरपूर (उपपथक) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती रॅलीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार , शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. रॅलीदरम्यान शहरातील नागरिकांना हिवताप प्रतिबंधासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मान्यवरांनी यावेळी नागरिकांना घर परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले.
पाण्याचे साचलेले ठिकाण टाळल्यास डासांची उत्पत्ती रोखता येते, याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमात जीवशास्त्रज्ञ स्वाती अनपट, नागरी हिवताप विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच आशा सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमामुळे शहरात हिवताप प्रतिबंधाबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला.


























