सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तब्बल 90 बेरोजगार मुला-मुलींना नामांकित कंपन्यांकडून ऑफर लेटर देण्यात आले.
या रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स, फियाट मोटर्स, व्हर्लपूल, भारत फोर्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वय व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामावर रुजू करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उद्घाटक म्हणून डॉ. औदुंबर मस्के यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी उत्तर सोलापूर बाबुराव जमादार तसेच अमोल साबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेडचे चार राज्यांचे प्रमुख प्रकाश पवार, लिंगप्पा वाघमोडे आणि कांचन पाटील यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
हा रोजगार मेळावा उत्तम नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर बंगाळे, किरण पारवे आणि एजाज कनोल यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, अशा उपक्रमांची गरज समाजात अधिक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


























