सोलापूर – स्व. श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून डब्ल्यू. आय. टी. जैन टेम्पल येथे बालक आणि युवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आयोजित ‘श्री जिन संस्कार शिबिर’ तसेच मौजी बंधन व्रत स्वीकार सोहळा अत्यंत भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
या शिबिरातून बालमनांवर लहानपणापासूनच अध्यात्म, संयम, शुद्ध आहार आणि सुसंस्कारांचे बीजारोपण करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. परमपूज्य १०८ श्री धवलसागरजी महाराज आणि विशालसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात भारतीय संस्कृतीतील संस्कारपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. “भारत हा संस्कार, सभ्यता आणि मूल्यांचा देश आहे. बालकांवर योग्य संस्कार झाले, तर ते जीवनात भरकटत नाहीत,” असे त्यांनी नमूद केले. गुरु आणि मुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनमूल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आचार्य जिनसेन लिखित ‘श्री आदिनाथ पुराण’ या ग्रंथात मौजी बंधन विधी व व्रतसंस्कारांचे उल्लेख आढळतात, याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच आचार्य देशभूषण महाराज यांनी चौदाव्या वर्षी आचार्य विद्यासागर महाराजांवर मौजी बंधन संस्कार केल्याचा ऐतिहासिक संदर्भही मांडण्यात आला.
मौजी बंधन विधीद्वारे मुला-मुलींना सात्त्विक जीवनशैलीचे नियम, व्रत आणि शपथा देण्यात आल्या. सप्त व्यसन त्याग अंतर्गत मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणे, मद्यपान, तंबाखू व सिगारेटचा त्याग, चोरी व अनैतिक वर्तन टाळणे, ब्रह्मचर्याचे पालन, तसेच दररोज मंदिरात जाऊन अभिषेक करण्याचे नियम देण्यात आले. ‘ॐ ऐं नमः’ हा सरस्वती मंत्र नियमित जपण्याची प्रेरणा देण्यात आली. संस्थेचे विश्वस्त डॉ. रणजित गांधी यांनी मान्यवरांचा शाल, मोतीमाळ व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त पराग शहा यांनी केले.
——
डब्ल्यू.आय. टी.तील विद्यार्थ्यांचे मौजी बंधन
या सोहळ्याची विशेष बाब म्हणजे डब्ल्यू. आय. टी. महाविद्यालयातील सुमारे २२ वर्षीय विद्यार्थ्यांनीही मौजी बंधन विधी स्वीकारत मुंडन करून विविध नियम अंगीकारले. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.
—–
आदर्श विकास घडविणार : पालकमंत्री
कार्यक्रमास सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप शहराध्यक्ष नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, महापौर विनायक कोंड्याल, नरेंद्र काळे, रंजीता चाकोते, इंद्रजीत पवार, साधना संगवे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी महाराजांना श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये सामाजिक एकोपा राखत आदर्श विकास घडवण्याचे आश्वासन दिले.

























