सोलापूर – बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराचा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. २३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या या शिबिराला विद्यार्थी आणि पालकांनी उदंड प्रतिसाद दिला. संस्कार, कला आणि व्यक्तिमत्व विकासाची शिदोरी देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरले.
शिबिराची सुरुवात दररोज सकाळी अन्नपूर्णा साखरे, अर्चना अडसूळ आणि शोभा गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली होत होती. यामध्ये ध्यान, प्राणायाम, शारीरिक व्यायाम आणि स्तोत्र पठण यांवर भर देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत झाली.
प्रसिद्ध गायक व संगीत तज्ज्ञ प्रशांतजी देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वर, ताल आणि लयीचे धडे दिले. मुलांकडून बालगीते व कविता गाऊन घेत त्यांनी संगीताची गोडी निर्माण केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मधमाशी जशी फुलाफुलांतून थोडा थोडा मध गोळा करते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी जिथे जिथे ज्ञान मिळेल, तिथून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” प्रसिद्ध कलाकार भैरप्पा कारभारी यांनी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तू बनवण्याचे कौशल्य शिकवले, तर नृत्य प्रशिक्षिका कु. तेजश्री श्रीरेखम यांनी विद्यार्थ्यांना नृत्याच्या विविध हालचालींचे प्रशिक्षण दिले.
‘वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशन’च्या वतीने पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष अजित चव्हाण, सिद्धांत चव्हाण आणि सुरज धाकपाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वहस्ते घरटी बनवून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. या समारोप कार्यक्रमास बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई यलगुलवार, कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ, सहकार्यवाह संजय सावंत तसेच नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे उपस्थित होते.
अध्यक्षा सीमा यलगुलवार म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्ध आहे. वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी असाच उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.” यावेळी बालरंग भूमीचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांना मिळालेल्या विशेष पुरस्काराबद्दल बालरंगभूमी परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिबिरातील प्रशिक्षक प्रशांत देशपांडे, अन्नपूर्णा साखरे आणि शोभा गिराम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुकुंद शेटे, मच्छिंद्र सफताळे, गणेश कोळी, खंडू शिंदे आणि दिक्षित यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना दररोज खाऊ आणि सरबत वाटप करण्यात आले. भविष्यातही अशा उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा विद्यार्थी व पालकांनी यावेळी व्यक्त केली.

























