सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने आयोजित २२ व्या बालनाट्य स्पर्धा सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत समर्पित नाट्य शाळेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या ‘विठ्ठलास आमंत्रण’ या बालनाट्यात बाल वारकऱ्यांनी विशेष सहभाग नोंदवला. त्यांच्या या प्रभावी सादरीकरणाबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याचे आयोजन समर्पित नाट्य शाळेच्या वतीने करण्यात आले होते. सिने-नाट्य कलाकार अमीर तडवळकर व अश्विनी तडवळकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या नाट्य विभागाचे प्रमुख डॉ. गणेश शिंदे आणि डॉ. मुकुंद लिमये वैद्य यांच्या हस्ते बाल वारकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याकार्यक्रमाला हरिपाठ परिवाराचे संस्थापक बळीराम जांभळे महाराज तसेच अविराज जांभळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था आणि हरिपाठ परिवाराच्या माध्यमातून या मुलांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवले.
विशेष म्हणजे, या सर्व बाल वारकऱ्यांना वारकरी परंपरेचे धडे बळीराम जांभळे महाराज यांनी विनामूल्य दिले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये संस्कार, भक्तीभाव आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमामुळे बालकलाकारांना प्रोत्साहन मिळाले असून, वारकरी संस्कृती जपण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

























